विशेष प्रतिनिधी
पुणे : कॅन्सरमुळे पती शेवटची घटका मोजत होता. हे लक्षात येताच पत्नीने देखील त्याचा विरह नको म्हणून, इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ( Wife commits suicide while husband is counting down the last hours Both cremated at the same funeral home)
गंगाधर चक्रावार (वय-६५) आणि गंगाणी उर्फ मंगल चक्रावार (वय-५५) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. रविवार (दि.६) पती- पत्नीच्या मृत्यूनंतर आळंदीत दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे दाम्पत्य नांदेड शहरातील चौफाळा येथील रहिवासी होते. पाच वर्षापूर्वी संपूर्ण कुटुंबीय पुणे येथील आळंदीत स्थलांतर झाले. पती – पत्नी हे दोघे आळंदी येथील गुरु महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या दरबारात सेवा करत होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. गंगाधर चक्रावार यांना कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले.
आपल्या पतीचा अंतिम क्षण जवळ आला आहे, हे समजताच पत्नी गंगाणी यांनी रविवारी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहे, असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी माऊलींचे दर्शन घेतले. नंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृत्यूआधी त्यांनी मी देव दर्शनाला जात आहे, असे मोबाईलमध्ये स्टेटस देखील ठेवले होते. रविवारी (दि.६) एकाच सरणावर दोघांवर आळंदी येथील नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.