विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी विरोधकांनी पैसे दिल्याच्या अफवांचे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने खंडन केले. गरज पडल्यास आर्थिक व्यवहार तपासण्याची परवानगी कामराने दिली आहे. जेणेकरून कुणाकडून पैसे मिळाले का? याचा तपास करता येईल, असे त्याने म्हटले आहे. माफी मागेल पण न्यायालयाने सांगितले तरच असेही त्याने म्हटले आहे. ( Will apologize but only if the court tells me .. Kunal Kamra’s role)
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवितेवरून राज्यात एकच गदारोळ सुरू झाला आहे. विधिमंडळात देखील कामरावरून विरोधक आणि सत्ताताधारी आमने-सामने आले आहे. कुणाल कामरा काहीही चुकीचे बोलला नाही, असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची पाठराखण केली आहे. यातच पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधला आहे. तेव्हा, “एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानाच पश्चाताप होत नाही,” असे कुणाल कामराने पोलिसांना म्हटले आहे. याबद्दल एका इंग्रजी संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.सुपारी घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते. पण, ‘कुणाचीही सुपारी घेऊन एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले नाही,’ असे कुणाल कामराने पोलिसांजवळ स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे. पण, न्यायालयाने सांगितल्यास मी एकनाथ शिंदे यांची माफी मागेन, असे कुणाल कामराने पोलिसांना म्हटले आहे.
सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लोक आपण आहोत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. खरे म्हणजे, हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याचा इतिहास पाहिला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो अथवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचे बोलणे, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीने बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला एकप्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला.”