विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे. एकत्र येणे कठीण नाही फक्त इच्छेचा प्रश्न आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी टाळी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Will the Thackeray brothers come together Raj said its not difficult just a question of will)
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतत राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.
महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी प्रथमच थेट भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.
शिवसेनेत झालेल्या बंडावर आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही.
आत्तापर्यंत शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा ठाकरे गटाच्या नेत्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.