विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत?” असा सवाल करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, नेते एकनाथ खडसे यांचा फोटो X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. “एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा” असे म्हणत खडसेंनाही डिवचले आहे. (With whom were thepink chats held Girish Mahajan questions Eknath Khadse)
हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हनी ट्रॅपमध्ये सत्ताधारी मंडळींमधील काही मंत्री आणि आमदार फसले गेले आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण या प्रकरणाचे खरे धागेदोरे हे प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीकडे आहेत. प्रफुल लोढा याला हनी ट्रॅप प्रकरणात अटक झाल्यानंतर या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला. पण ज्या लोढाला अटक झाली आहे, त्याचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरुवातीला विरोधकांकडून लोढा याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्यात आले. त्यानंतर महाजनांचे राजकीय शत्रू एकनाथ खडसेंनी सुद्धा या प्रकरणावरून गंभीर आरोप केले. त्यामुळे आता हे प्रकरण वाढले असून महाजनांनी सातत्याने खडसेंना डिवचण्याचे काम सुरू केले आहे.
हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल लोढा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर मंत्री महाजनांनी लोढा हा सर्वपक्षीय असल्याचे सांगत त्याचे शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो प्रसार माध्यमांना दाखवले.
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो साधारणतः कोरोना काळातील असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यावेळी फोटोत दिसणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्याला मास्क लावलेले आहेत. पण महाजनांनी हा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय… हाच तो प्रफुल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे…” असे महाजनांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसेच, “2019 ते 2022 च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…!” असे म्हणत महाजनांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.