विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर घरातच मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याच्या गंभीर आरोपांनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आयोगाला निवेदन पाठवून या प्रकरणात त्वरेने हस्तक्षेप करून तनुश्रीच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी मागणी केली आहे.
( Womens Commission should take immediate action in Tanushree Duttas harassment case Dr. Neelam Gorhe demands)
तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या घरात सातत्याने छळ केला जात असल्याचे म्हटले होते. २०२० पासून तिच्या घराबाहेर दरवाजे आपटणे, आरडाओरडा करणे, शंका निर्माण करणाऱ्या चोरीच्या घटना, पिण्याच्या पाण्यात छेडछाड केल्याचा संशय, तसेच घरकाम करणाऱ्या नोकरांचा छळासाठी वापर अशा अनेक गोष्टी घडत असल्याचा दावा तिने केला आहे. या प्रकारांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली असून तिला सतत असुरक्षिततेची भावना भेडसावत असल्याचेही तिच्या पोस्टमधून स्पष्ट होते.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत राष्ट्रीय महिला आयोगाने संबंधित स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चौकशी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी तनुश्रीला कायदेशीर मदत, मानसोपचार सहाय्य आणि सुरक्षेची हमी देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
“अशा प्रख्यात अभिनेत्रीच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला कुठलाही धोका पोहोचू नये. तिच्या मनःस्वास्थ्यासाठी आणि तिच्या आरोपांची सखोल चौकशी होण्यासाठी महिला आयोगाने पुढाकार घेतला पाहिजे,” असे गोऱ्हे यांनी ठामपणे म्हटले आहे.
दरम्यान, तनुश्री दत्ताने आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. “२०१८ मध्ये मी केलेल्या आरोपांनंतरच माझ्या आयुष्यात या अडचणी सुरू झाल्या. त्याआधी मी कधीच अपघाताच्या किंवा पाठलागाच्या भीतीत नव्हते. आता मात्र प्रत्येक गोष्ट २०१८ मधील त्या प्रकरणाशी जोडली जात आहे. या मागे केवळ नाना पाटेकर नाही, तर बॉलिवूडमधील एक माफिया गँगही सक्रिय आहे जी मला लक्ष्य करत आहे. मला त्रास देणाऱ्या गँगमध्ये कोण आहेत, हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही, पण माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांच्या मागे त्यांचा हात आहे,” असे ती म्हणाली.