विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी न्यायालयात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या वकिलाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. राज्य महिला आयोगानेही बार कौन्सिलला पत्र लिहून याबाबत गांभीर्याने विचार व्हावा आणि अधिवक्तांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचना केल्या आहेत.
( Womens Commission writes to Bar Council against Hagavanes lawyer for defaming Vaishnavis character)
हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवीवर आरोप करण्यात आले. वैष्णवीचे त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा युक्तीवाद हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांनी केला. त्यानंतर राज्यभरातून वकील दुशींग यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. दुशींग यांच्याविरोधात राज्य महिला आयोग सुद्धा संतापले असून त्यांनी सचिव, बार कौन्सिल यांना पत्र लिहून याबाबत गांभीर्याने विचार व्हावा आणि अधिवक्तांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचना केल्या आहेत.
वैष्णवी हगवणे केसमधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन ॲडव्होकेट्स कायदा 1961 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमात बोलताना भान बाळगणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने सचिव, बार कौन्सिल यांना पत्र लिहून याबाबत गांभीर्याने विचार व्हावा आणि अधिवक्तांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचना केल्या आहेत. तसेच, पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा सासरकडून हुंड्यासाठी होणारा छळ आणि मृत्यू या अतिशय संवेदनशील विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, असे असताना आरोपींच्या अधिवक्त्यांकडून माध्यमांत मयत वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप केले जात आहेत, असेही या पत्राच्या माध्यमातून म्हटले गेले आहे.
आपणांस जे काही सादर करायचे आहे ते आपण मा. न्यायालयात पुराव्यानिशी सादर करावे. आपल्या वक्तव्यामुळे पीडितेची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक, भावनिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. समाज म्हणून वैष्णवी हगवणे हिला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. न्याय मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमातून होणारे असे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे असून मनोबल खच्ची करणारे आहे, असेही राज्य महिला आयोगाने सचिव, बार कौन्सिलला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.