विशेष प्रतिनिधी
लातूर : लातूरमध्ये अंबाजोगाई रस्त्यावर एका तरुणाला पाच-सहा जणांनी बेदम मारहाण केली आणि ते दुचाकीवर बसून पळून गेले. गुंडांची ही टोळी तरुणाला नग्न करून मारहाण करत होती आणि १००-१५० लोक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र, बघ्यांच्या गर्दीतील कोणीही त्या गुंडांना अडवलं नाही. भर रस्त्यात निपचित उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. (Young man stripped naked and beaten on the street in Latur, 100 to 150 people saw him but no one came to save him)
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चार तासांनी पोलिसांनी या गुंडांच्या टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना धडा शिकविण्यासाठी गुंडांची रस्त्यावरून वरात काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. भर रस्त्यात निपचित उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का? पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा, असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. कोणताही माणूस असू द्या, क्षणात विचार करेल की अरे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय. आवरा यांना, अन्यथा एखाद्या दिवशी हे लोक थेट यंत्रणेलाच आव्हान देतील. सावध व्हा आणि कारवाई करा. अशा घटनांमध्ये केवळ नावाला (दिखावा म्हणून) कारवाई करू नका. ही प्रकरणं न्यायालयात गेल्यानंतर पीडितांची बाजू व सरकारची बाजू मांडण्यासाठी चांगले सरकारी वकील नेमा.