विशेष प्रतिनिधी
पिंपरी : वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई कॉलनी येथे
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रविवारीरात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला . मध्यरात्री याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( Young woman stabbed to death on the road in Chinchwad)
कोमल भारत जाधव (वय १७, रा. कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. कोमल ही कृष्णाई कॉलनी, चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोमलचे मामा सचिन माने यांची मुलगी आदिती हिने फोन करून कळवले की, कोमल दिदीवर दोघांनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे. सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून ऑक्सीकेअर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोमलला पाहून तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.