विशेष प्रतिनिधी
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकतीच घडलेली घटना ही केवळ धक्कादायक नव्हे, तर मानवी संवेदनांनाही काळिमा फासणारी आहे. या घटनेविरोधात आज युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अक्षय जैन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काळे शाई फेकत निषेध नोंदवला, तसेच रुग्णालयाच्या नावाच्या फलकाची फाडफाड करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
( Youth Congresss intense protest at Dinanath Mangeshkar Hospital Ink thrown placards torn)
या वेळी बोलताना अक्षय जैन म्हणाले,
“हे रुग्णालय शासनाकडून मोफत भूखंड घेते, इमारत उभारण्यासाठी दात्यांकडून कोट्यवधी रुपयांचे योगदान स्वीकारते आणि तरीही येथील प्रशासनाची अवस्था एवढी भयानक आहे की सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा यातून वाचू शकत नाहीत, तर सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल? माझी आईसुद्धा याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती, आणि कॅन्सरसारख्या आजाराने तिचं निधन झालं. त्यामुळे मी स्वतः अनुभवले आहे की या रुग्णालयातील प्रशासन किती बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे.”
“ही केवळ आरोग्यसेवा नव्हे, तर रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मजबुरीचं शोषण करून सुरू असलेला एक प्रकारचा ‘सुविधाजन्य खंडणीचा’ व्यवसाय आहे. तथाकथित धर्मादाय संस्थांच्या नावाखाली चालणाऱ्या या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांची लूट सुरू आहे आणि सरकार डोळे झाकून बसलं आहे.”
याप्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची भूमिकाही संशयास्पद असल्याची टीका करत अक्षय जैन म्हणाले,
“या रुग्णालयाविरोधात अनेक तक्रारी असूनसुद्धा कोणतीच ठोस कारवाई आजवर झाली नाही. केवळ फॉर्मॅलिटीसाठी तपास करून फायली बंद केल्या जातात. रुग्णालयाच्या संकेतस्थळावर दिलेले PRO (जनसंपर्क अधिकारी) चे नंबर देखील अशा व्यक्तींचे आहेत, जे ३ ते ६ महिन्यांपूर्वीच नोकरी सोडून गेले आहेत. ही लोकांची थट्टा आहे की सेवा?”
“आम्ही गांधीजींच्या विचारांवर विश्वास ठेवतो, पण त्याचवेळी भगतसिंहांच्या क्रांतीशीलतेची प्रेरणाही आमच्यासोबत आहे. आजपासून जर राज्यातील कुठलेही रुग्णालय अशा प्रकारे जनतेसोबत वागेल, तर त्याला तीव्र जनक्षोभाचा सामना करावा लागेल. हा केवळ पुण्यापुरता मुद्दा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चेतावणी आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
“धर्मादाय आयुक्तांनी उत्तर द्यावं की आजवर किती रुग्णालयांवर अशा प्रकरणात कारवाई केली आहे? केवळ परवानग्या आणि नोंदण्या पुरेशा नाहीत; जेव्हा सामान्य माणसाचा जीव धोक्यात असतो, तेव्हा प्रत्यक्ष कठोर कारवाईची गरज असते.”
युवक काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, जर अशा संस्थांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र स्वरूप धारण करेल आणि राज्यभरात अशा संस्थांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल.
या आंदोलनात मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन,शहराध्यक्ष सौरभ आमराळे,
ग्रामीण अध्यक्ष उमेश पवार,
प्रवेश आबनावे, भूषण राणभरे, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, डॉ. नीरज जाधव, सद्दाम शेख, अथर्व सोनार, विशाल कामेकर, गणेश उबाळे, अविनाश साळुंखे, निशांत देशमुख, अभिजित हळदीकर आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.