विशेष प्रतिनिधी
पुणे : अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा उध्दव ठाकरे यांचा प्रस्ताव अमित शहा यांनीच फेटाळून लावला होता. त्यानंतर मीच त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
( Uddhav Thackeray was offered the post of Deputy Chief Minister.
Devendra Fadnavis’ secret explosion)
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती का तुटली यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले,
उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केल्यानंतर मी अमित शाह यांच्याशी बोललो. तेव्हा अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता.
फडणवीस म्हणाले, 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचा आकडा 120 वर गेला असता तर उद्धव ठाकरे कधीच भाजप सोडून गेले नसते. पण जसे त्यांच्या लक्षात आलं की नंबर गेम फसत आहे. आम्ही सरकार बनवू शकतो तेव्हा त्यांनी आपला रंग बदलला.
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं. आम्ही दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो.त्यांनी पीसी घेतली तेव्हापासून ते त्यांचं सरकार येईपर्यंतच्या दिवसापर्यंत त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही. माझ्याशी साधी चर्चाही केली नव्हती. त्यांनी परस्पर निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्याच दिवशी दुसरीकडे जाण्याचं ठरवलं होतं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. त्यात शिवसेनेची लढत जिथे काँग्रेस विरोधात आहे, तिथे एनसीपीने शिवसेनेला मदत करायची आणि जिथे एनसीपीची लढत भाजपशी आहे, तिथे शिवसेनेने एनसीपीला मदत करायची हे ठरलं होतं. कारण शिवसेनेच्या जागा कमी झाल्या तर भाजप सरकार बनवेल अशी भीती होती. जे काही प्रीपोल होते त्यात भाजपचं सरकार येणार असल्याचं स्पष्टच दिसत होते, असा आरोप त्यांनी केला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदानाचा टक्का कसा वाढला? असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, जनतेने आपली साथ सोडलीय हे जोपर्यंत राहुल गांधी यांना समजणार नाही, तोपर्यंत त्यांची अशाच पद्धतीने हार होणार आहे. कधी कधी तुमच्यासोबत कोण आहेत हे महत्त्वाचं ठरतं. पीसी घेताना संजय राऊत यांना घेऊन बसणार तर असेच विचार येणार. जे पत्र निवडणुकीनंतर आयोगाला महाविकास आघाडीने लिहिलं होतं. त्याला आयोगाने उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खासियत म्हणजे त्यांना सत्य कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही. ते मुन्नाभाई एमबीबीएस आहेत. ते आपल्याच विश्वात असतात.