पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना पुणे सत्र कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रविवारी पहाटे खराडी येथील एका पार्टीतून प्रांजल खेवळकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. यात दोन महिलांचा देखील समावेश होता. या दोन महिलांनीच कट रचून प्रांजल खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप केला जात आहे. प्रांजल खेवलकर यांना यापूर्वी दोनदा दोन दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज गुरुवारी प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलिसांनी खराडी ड्रग्ज प्रकरणी 5 पुरुष व 2 महिला अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात 7 पैकी 2 जणांनी अल्होहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्कोहोल सेवन करणाऱ्यांत प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. याशिवाय श्रीपाद मोहन यादव नामक आरोपीनेही अल्कोहोलचे सेवन केले आहे. आता पुढील तपासणीसाठी आरोपींच्या रक्ताचे व लघवीचे नमुणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती. पोलिसांच्या छापेमारीत घटनास्थळी दारू व हुक्का, कोकेनसह इतर अंमली पदार्थ आढळले. याशिवाय एक लॅपटॉप, तीन पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क व इतर महत्त्वाचे दस्तऐवजही या कारवाईत जप्त करण्यात आलेत. खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमधील 101 व 102 क्रमांकाची खोली प्रांजल यांच्या नावाने बूक करण्यात आली होती.