विशेष प्रतिनिधी
पुणे : राजकारणाबद्दल माझे मत चांगले नाही. इथे फक्त युज आणि थ्रो केले जाते. त्यामुळे पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, आपल्या देशात विचारधारा अडचण नाही तर विचारशून्यता समस्या आहे. ज्या पक्षाची सत्ता येईल त्याकडे अनेकजण उड्या मारतात. त्यामुळे नेमकी विचारधारा, निष्ठा कुठे जाते? राजकारण मध्ये प्रत्येकाला पद हवे आहे. कोणाला पद नको असे कधी कोणी म्हणत नाही. पक्षाचा ठप्पा लागला की मर्यादा येतात. खेडेकर यांनी कधी राजकारणात येऊन पद मिळावे अपेक्षा केली नाही तर त्यांनी लोकप्रतिनिधीपेक्षा मोठे काम उभारले आहे.
समाजातील अस्पृश्यता, विषमता आणि जातीयवाद नष्ट झाली पाहिजे. गुणवत्ता असेल तर कोणते अडथळे जीवनात येत नाही. समाजात कर्तुत्व नेतृत्व हे संस्कारशी निगडित आहे. ज्यांचे आई वडील चांगले संस्कार घरी करतात तेच मुले पुढे उत्तम होतात. जिजाऊ माँ यांनी चांगले संस्कार शिवाजी राजे यांच्यावर केल्याने ते उत्तम राजे झाले आहे. कोणी किती मोठे आणि श्रीमंत असेल तरी संस्कार आवश्यक आहे. जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन भविष्य पिढी घडवावी, असे आवाहन करून गडकरी म्हणाले, मी आई आणि वडील यांच्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो. त्यांनी राज्य करताना अनेक लढ्या जिंकल्या. पण कोणतीही धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली नाही. कोणावर अत्याचार केला नाही.सर्व धर्म समभाव असलेले हिंदुस्थान मधील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे.
गडकरी म्हणाले, खेडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात सामाजिक जाणीव आहे . मराठा समाजासाठी खेडकर यांनी काम केले. पक्षाचा शिक्का लागला की मर्यादा येतात. त्यामुळे त्यांनी पक्षाचा शिक्का लागू दिला नाही.
नोकरी पेक्षा व्यवसायिक बना त्यातून उद्यमशीलता निर्माण होऊन समाजाचा विकास होईल. समाजाचां सर्वांगीण विकास होण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. लाखोंचे आयुष्य बदलले पाहिजे. नागपूर विमानतळ वरून शेतकरी यांनी तयार केलेल्या जैविक इंधनावर विमान उड्डाण झाले पाहिजे यादृष्टीने काम करण्यात येत आहे.
– गडकरी म्हणाले, जगात आपल्याला विकास साधायचा असेल तर आपल्याला ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. आगामी काळात ज्ञान मिळवणे हाच यशाचा मंत्र आहे. ज्ञान सोबत जीवन मूल्य देखील महत्वपूर्ण आहे. प्रत्येक मोठ्या व्यक्तीने काही आधार धरून पुढे वाटचाल केली आहे.