विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला झालेली मारहाण केवळ रस्त्यावरील भांडणातून नाही असा संशय निर्माण करणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यावरून देवेंद्र जोग याला मारहाण झाली त्यावेळी गजा मारणे हा काही अंतरावरच उभा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे. ( Devendra Jog Assault Case: ‘He’s Arrogant, Beat Him Up,’ Gaja Marne’s Alleged Instructions)
‘याला माज आलाय, याला मारा’ अशा सूचना देखील गजा मारणे तिथे उपस्थित आपल्या माणसांना देत होता. या संदर्भातले पुरावे आता न्यायालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गजा मारणेला तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर या ठिकाणी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे टोळीतील गुन्हेगारांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गजा मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर आणि श्रीकांत पवार या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रुपेश मारणे आणि श्रीकांत पवार अद्यापही फरार आहेत.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मिडीयाचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारे आरोपी नुकतेच एका प्रकरणात जामिनावर सुटेल आहेत.