विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले यांनी भेट घेऊन सूर्यवंशी कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली. (Somnath Suryavanshi’s death was due to police beating, Ramdas Athawale’s allegation)
आठवले यांनी आज परभणीत जावून न्यायालयीतन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं होतं? ते समजून घेतलं. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू झाला, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
“सोमनाथ सूर्यवंशी लातूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तो परभणीत लॉचा विद्यार्थी होता. आंदोलनात त्याचा काही संबंध नव्हता. तो तिथे फोटो काढत होता. पोलिसांनी सांगितले हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर युवकांमध्ये संताप होता. पकडून मारहाण करणे चुकीचे आहे. लॉकअपमध्ये मारहाण झाली. त्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला, असं आमचं म्हणणं आहे”, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. पोलिसांनी अन्याय करणे बरोबर नाही. विटंबना करणारा मनोरुग्ण नाही. मी राज्याच्या पोलीस महासंचालक रक्ष्मी शुक्ला यांना या विषयी बोलणार आहे. आम्ही नक्की पाठपुरावा करू. आम्ही आरपीआय पक्षाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार आहोत. विजय वाकोडे यांचं स्मारक उभारण्यासाठी मनपाने जागा द्यावी. आम्ही आमच्या खात्यामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करू”, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी यावेळी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “बीड प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा सरळ संबंध नाही असे मला वाटते. मात्र दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मास्टर माईंड कोण आहे हे मला माहीत नाही. मात्र तपास माझ्याकडे दिल्यास मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून काढीन. मी बीड जिल्ह्यात जाऊन आलो. संतोष देशमुखचे आरोपी अद्यापही सापडत नाही. मस्साजोग प्रकरणात अद्यापही घरच्यांचा जबाब घेतला नाही. सीआयडीने लवकर जबाब घ्यावा. ही गृह विभागासोबतच पोलिसांची जबाबदारी आहे. सीआयडीकडे बीडचा तपास आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.