विशेष प्रतिनिधी
चामोली : उत्तराखंडमध्ये बद्रीनाथजवळ हिमकडा कोसळल्याने हाहाकार उडाला आहे. चमोली जिल्ह्यातील माणा गावाजवळील एका हिमनदीतून आलेल्या पूरामुळे मोठा हिमकडा कोसळला. या घटनेत सीमा रस्ते संघटना (BRO) चे 57 कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी 16 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ( Destruction in Badrinath, the edge of the glacier collapsed due to flooding, 57 workers are feared to be trapped.)
स्थानिक प्रशासन, पोलिस, भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) या बचावकार्यांसाठी कार्यरत आहेत. मात्र, या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे शोध आणि बचाव मोहिमेला अडथळा येत आहे. प्रशासनाने अद्याप अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून पोस्ट करत सांगितले, “चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ BRO च्या बांधकाम प्रकल्पादरम्यान हिमस्खलन झाले असून अनेक कामगार अडकले आहेत. ITBP, BRO आणि इतर बचाव पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. प्रभू बद्री विशाल यांच्या चरणी प्रार्थना आहे की, सर्व कामगार सुरक्षित राहो.”
गरवाल परिक्षेत्राचे महानिरीक्षक (IG) राजीव स्वरूप यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, “माणा गावाजवळ हिमकडा कोसळल्याने BRO चे अनेक कामगार अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्ग मोकळा करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.”
संरक्षण भूगोलमाहिती संशोधन संस्थेने (DGRE) कालच चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिथौरागड आणि बागेश्वर या जिल्ह्यांसाठी हिमस्खलनाचा पिवळा अलर्ट जारी केला होता. तसेच, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि लडाखसाठीही हा इशारा देण्यात आला होता. हा अलर्ट 27 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून 28 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लागू होता. सध्या संपूर्ण यंत्रणा अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
या घटनेने 2021 मध्ये चमोली जिल्ह्यातील नंदा देवी हिमनग कड्याच्या तुटल्यामुळे आलेल्या प्रलयाची आठवण करून दिली. त्या वेळी हिमस्खलन आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.