विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर भगवा परिधान केलेला फोटो शेअर केला. त्यासोबत ‘शहा का रुतबा’ हे गाणे लावले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. ( Ravindra Dhangekar gave a signal to quit Congress by posting a picture wearing saffron)
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असून वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याचं, रविंद्र धंगेकर यांनी म्हटले होते.
शहर काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी आणि अंतर्गत राजकारणामुळे अस्वस्थता आहे. पक्षाने अलीकडेच विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या. परंतु या यादीतून धंगेकरांना डावलण्यात आले. विशेषतः कसबा मतदारसंघाच्या जबाबदारीसाठी त्यांना विचारण्यात आले नाही. कसब्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी पक्षातील नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली. निरीक्षकांनी सहायक निरीक्षक आणि ब्लॉक अध्यक्षांच्या मदतीने विधानसभा मतदारसंघात जावून बैठका घेऊन मेळाव्यांचे आयोजन करणे, तसेच पक्ष संघटनेबाबतच्या सद्य स्थितीचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीला देणे अपेक्षित आहे. कसब्यात डावलण्यात आल्याने धंगेकर अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नाही का? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे.
राज्यात सध्या शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते की पुण्यातही ऑपरेशन टायगर वेगाने राबवले जाईल. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक माजी आमदार, नगरसेवक, तसेच महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते पक्ष सोडत आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील काही नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने धंगेकरही त्या दिशेने जाणार का? असा प्रश्न आहे.