विशेष प्रतिनिधी
पुणे : काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषा, माणसाला त्रास देण्याचे काम करत असतील, तर कठोर कायद्याद्वारे शासन झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व, अस्मिता टिकविण्याची कार्यवाही केली पाहिजे, असा इशारा उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिला. ( Strict rule if Marathi language, people are disturbed, Uday Samant’s warning)
तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत उपस्थित होते. सामंत म्हणाले, “सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे. मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम पुणेकरांनी उचलून धरला आहे. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार झाला पाहिजे, त्यासाठी मराठी ही शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचली पाहिजे. शोभा यात्रेत सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे. युवा पिढीची जबाबदारी आहे, की मराठी टिकविणे आणि आक्रमणाचा आक्रमकतेने प्रतिकार केला पाहिजे.
मराठी टिकविणाऱ्यांचा आदर्श हा दीपस्तंभाप्रमाणे ठेवला पाहिजे. पुढील वर्षी मालगुंड गावाला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रातील अशी गावे शोधली जातील, त्यामध्ये मराठी जतन-संवर्धन करणाऱ्या व्यक्तीचे गाव पुस्तकांचे गाव केले जाईल, असे त्यांनी सांगितले .
महाराष्ट्रात प्रत्येक जाती-धर्माचा माणूस राहतो. प्रत्येक भाषकाचा आदर केला आहे. भाषेचा अनादर केलेला नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषा, माणसाला त्रास देण्याचे काम करत असतील, तर कठोर कायद्याद्वारे शासन झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व, अस्मिता टिकविण्याची कार्यवाही केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतानाअजित पवार म्हणाले, “मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल स्वाभिमान बाळगणारी माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी आली. परदेशातूनही मराठी प्रेमी येथे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने मराठी भाषेसाठी योगदान देत असतो.” तसेच, दिल्लीतील मराठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जाईल, असे पवार यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठी भाषेला अडीच वर्षांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला, हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाषेत उत्तम साहित्य निर्माण होते, हे आपण दाखवून दिले आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते, तसेच भाषेचेही कार्यकर्ते आहोत. आम्ही मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल, ते आम्ही सरकारच्या माध्यमातून करू.” मनीषा म्हैसकर यांनी प्रास्ताविक केले.