विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर होण्याची भीती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.मोठ्या आकाला वाचवण्यासाठी हे होऊ शकते असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
वडेट्टीवार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने, या गुन्ह्यातील सुत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे इन्काऊंटर केले जाऊ शकते असा दावा देखील यावेळी केला आहे. “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती, जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली. यावरून काहीही होऊ शकतं, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे.
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुrवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे .
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचे बीड पोलीस स्थानकात लाड केले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे.पोलिस स्टेशनध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलीसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे”.