विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितलं की कुसुमाग्रज यांची एक कविता कणा तुम्हाला म्हणायची आहे. मी त्यांना विचारले ,सॉरी पण कणा याचा अर्थ काय असतो. त्यावर त्यांनी म्हटलं कणा म्हणजे स्पाईन… छावा हा चित्रपट केल्यानंतर मला कणा या शब्दाचा अर्थ समजला, असा ही कविता म्हणण्याचा किस्सा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने सांगितला.
(Vicky Kaushal said..After the film Chhawa I understood the meaning of the word Kana!)
विकी कौशलने मराठीतून त्याच्या भाषणाची सुरुवात केली. जय भवानी जय शिवराय, खरं सांगू तर मला आता खूप नर्व्हस वाटतं. मी मराठीत बोलू शकतो. दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकलो. दहावीत मराठीत जास्त मार्क होते, हिंदीत कमी होते. पण इतकी चांगली नाही. त्यामुळे चुकीला माफी असावी. जावेद सरांनंतर इथे येणं आणि मराठीत कविता म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात नर्व्हस क्षण आहे. नॉन महाराष्ट्रीयन असूनही ज्याचे संगोपन महाराष्ट्रात झाले, ज्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले, जो काम महाराष्ट्रात करतो आणि आज तो या मंचावर असणं मराठी भाषा दिनाच्या दिवशी शिवाजी पार्कात असणं ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राज ठाकरे तुम्ही मला हा मान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
गीतकार जावेद अख्तर म्हणाले, सर्व लोक मराठीत कविता सादर करत होत, तेव्हा मला प्रश्न पडला मी इथे का बसलो आहे? असा प्रश्न मला सतावत होता. मात्र, असे बरेच लोक आहेत जे तिथे बसायला नको आहेत, मात्र ते तिथे बसलेले आहेत. तर मग मी इथे बसलो त्यात काही चूक नाही. प्रत्येकाला आपली भाषा आलीच पाहिजे. मराठीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारखे महान कवी होऊन गेले. मराठी साहित्याने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. मराठीत अण्णाभाऊ साठे, ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे असे लेखक झाले आहे. दलित साहित्याची ओळख महाराष्ट्राने देशाला करुन दिली. नामदेव ढसाळ, दया पवार, प्रज्ञा दया पवार यांचे साहित्य मराठीत आहे. देशातील पहिली डॉक्टर ही मराठी होती, हे किती लोकांना माहित आहे. महाराष्ट्रातील साहित्यिकांची ओळख जगाला झाली पाहिजे. तुमच्या घरात खजाना ठेवलेला आहे, मात्र तुम्ही तो जगाला का दाखवत नाही?